mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

भारत-फ्रान्स संबंधांना नवे बळ | मोदी-मॅक्रॉन भेटीत विशेष धोरणात्मक भागीदारी, 114 राफेल कराराला मंजुरी | India France Strategic Partnership

शेअर करा :

India France Strategic Partnership : मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत भारत-फ्रान्स संबंधांना नवे परिमाण मिळाले. विशेष धोरणात्मक भागीदारीची घोषणा करत 114 राफेल फायटर जेट्स व हॅमर क्षेपणास्त्र खरेदीला मंजुरी देण्यात आली.

India France Strategic Partnership
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मंगळवारी मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय भेटीनंतर भारत-फ्रान्स संबंधांना नवे परिमाण मिळाले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करत भागीदारीला ‘विशेष धोरणात्मक’ स्तरावर नेण्याची घोषणा केली.

👉 केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत वाचा

“भारत-फ्रान्स भागीदारी जागतिक प्रगतीची” — पंतप्रधान मोदी

संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबतचे संबंध केवळ धोरणात्मक मर्यादेत नसून जागतिक स्थिरता आणि प्रगतीशी जोडलेले असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, “भारत-फ्रान्स भागीदारी ही केवळ धोरणात्मक नाही, तर स्थिरता आणि जागतिक प्रगतीची भागीदारी आहे. २०२६ हे भारत-युरोप संबंधांसाठी महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे.”

युरोपियन युनियनसोबत झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचा उल्लेख करत त्यांनी फ्रान्ससोबतचे संबंध अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

India France Strategic Partnership

“दोन्ही देशांचे संबंध विशेष आणि अद्वितीय” — इमॅन्युएल मॅक्रॉन

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत-फ्रान्स संबंधांना विश्वास, मोकळेपणा आणि सामायिक महत्त्वाकांक्षेची मजबूत पायाभरणी असल्याचे सांगितले.

“भारत आणि फ्रान्समधील संबंध खरोखरच विशेष आणि अद्वितीय आहेत. आज आम्ही ही भागीदारी नव्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते म्हणाले.

 

👉 जगभरातील ताज्या घडामोडींसाठी देश-विदेश विभागाला भेट द्या.

सांस्कृतिक सहकार्यालाही चालना

पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांची सांस्कृतिक परंपरा समृद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईतील लोकभवन येथे झालेल्या प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चेत डिजिटल तंत्रज्ञान, नवोपक्रम, विद्यार्थी गतिशीलता, संस्कृती, संरक्षण, सुरक्षा आणि हरित विकास या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवरही चर्चा झाली.

 संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय; राफेल-हॅमर खरेदीला मंजुरी

भारताच्या संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने या भेटीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. बैठकीदरम्यान ११४ राफेल फायटर जेट्स आणि हॅमर क्षेपणास्त्र खरेदीला मंजुरी देण्यात आली.

विशेष बाब म्हणजे, ही राफेल विमाने आता भारतामध्येच तयार केली जाणार असून हा प्रकल्प सुमारे ३.२५ लाख कोटी रुपयांचा असल्याची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.

भारत-फ्रान्स संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने झालेली ही बैठक द्विपक्षीय सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात असून जागतिक राजकीय आणि संरक्षण क्षेत्रात त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको