MSRTC CCTV Security Project Maharashtra : महाराष्ट्रातील एसटी बसस्थानके आणि विभागीय कार्यालयांच्या सुरक्षेसाठी १११ कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प सुरू. राज्यभर ६३३ ठिकाणी ७,०३५ कॅमेरे बसवून डिजिटल देखरेख मजबूत केली जाणार.


मुंबई : महाराष्ट्रभर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘लालपरी’ बसेस आणि बसस्थानकांच्या सुरक्षेला आता डिजिटल बळ मिळणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बसस्थानके, डेपो आणि विभागीय कार्यालयांमध्ये व्यापक सीसीटीव्ही देखरेख प्रणाली उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने या उपक्रमासाठी १११ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभर डिजिटल देखरेखीचे जाळे
या प्रकल्पांतर्गत एसटी बसस्थानके, डेपो, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच भोसरी येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्था अशा संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
राज्यातील ६३३ ठिकाणी एकूण ७,०३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना असून, त्यामुळे सर्व हालचालींवर सातत्याने डिजिटल निरीक्षण ठेवणे शक्य होणार आहे.
View this post on Instagram
अनुभवी संस्थेकडे प्रकल्पाची जबाबदारी
ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आलेल्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (TCIL) या संस्थेला हा प्रकल्प देण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
मुंबई येथे केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याची यूजर अॅक्सेप्टन्स टेस्ट (UAT) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
केंद्रीय नियंत्रणातून राज्यभर नजर
या नियंत्रण कक्षामधून राज्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे केंद्रीकृत निरीक्षण केले जाणार आहे. संशयास्पद हालचालींची त्वरित ओळख पटवून आवश्यक ती कारवाई जलदगतीने करता येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
पायलट टप्पा यशस्वी
प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा यशस्वीरित्या बसवण्यात आली आहे. उर्वरित २७ विभागांमध्ये तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
या उपक्रमामुळे राज्यातील एसटी बसस्थानके आणि कार्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे नवे डिजिटल युग सुरू होणार असून प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


