Mahila Aayog Aplya Dari Chandrapur Hearing : चंद्रपूर येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत ९५ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत वैवाहिक, सामाजिक व आर्थिक समस्यांवरील प्रकरणांचा निपटारा.


चंद्रपूर : राज्य महिला आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे आयोजित जनसुनावणीमध्ये महिलांच्या विविध समस्यांशी संबंधित एकूण ९५ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे ही जनसुनावणी पार पडली.


तक्रारींच्या प्रभावी निपटाऱ्यासाठी पाच स्वतंत्र पॅनलची स्थापना करण्यात आली होती. प्राप्त तक्रारींपैकी वैवाहिक व कौटुंबिक समस्यांच्या ७९, सामाजिक विषयांवरील ५, मालमत्ता व आर्थिक फसवणुकीच्या ६, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची १ तसेच इतर ४ तक्रारींवर सुनावणीदरम्यान कार्यवाही करण्यात आली. या जनसुनावणीला सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, भागवत तांबे, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिनाक्षी भस्मे यांनी केले. संचालन राणी खडसे यांनी तर आभार प्रदर्शन मोरेश्वर झोडे यांनी केले.
🔗 चंद्रपूरसह परिसरातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी विदर्भ कॅटेगरीला भेट द्या.
महिलांना स्थानिक पातळीवर न्याय देण्याचा उद्देश
उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिलांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे आणि त्यांना न्यायासाठी मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागू नये, यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी संबंधित यंत्रणांनी कोणतीही टाळाटाळ न करता तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी, असे निर्देश दिले. कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी सर्वाधिक प्रमाणात येत असल्याचे नमूद करत विवाहपूर्व समुपदेशनाची गरजही त्यांनी अधोरेखित केली. तसेच हुंडाबळीविरोधी कायद्याची जाणीव करून देत हुंडा देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🔗 महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी महाराष्ट्र कॅटेगरीला भेट द्या.
महिलांमध्ये अधिकारांविषयी वाढती जागरूकता
आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी जनसुनावणीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून महिलांमध्ये अधिकारांविषयी जागरूकता वाढत असल्याचे सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात अशा उपक्रमांद्वारे महिलांच्या अडचणी स्थानिक स्तरावर सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासन व पोलिस विभागाची भूमिका
अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले. प्रशासनात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी टीमवर्कच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी भरोसा सेल आणि दामिनी पथकाद्वारे महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘पोलिस काका’ व ‘पोलिस दिदी’ उपक्रमांतर्गत जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
🔗 नेहमी अपडेट राहण्यासाठी महालोकवार्ता सोबत देश-विदेशातील वाचा.


