Nanded HSC Exam Action 2026 : नांदेड जिल्ह्यात बारावी रसायनशास्त्र परीक्षेदरम्यान गैरहजर बैठे पथक सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली असून उपस्थिती 98.64% नोंदवली गेली.


नांदेड : दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील रसायनशास्त्र विषयाचा पेपर जिल्ह्यात पार पडला. जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांच्या माध्यमातून तसेच झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आले होते.
🔗 महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा 👉 महाराष्ट्र बातम्या
दरम्यान, उमरी तालुक्यातील नूतन उच्च माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर नियुक्त बैठे पथक प्रमुख व सदस्य गैरहजर आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी संबंधितांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये बैठे पथक प्रमुख विस्तार अधिकारी (कृषी) नरहरी मुंजाळ, सदस्य केंद्रप्रमुख मोहन भोसले आणि ग्राम महसूल अधिकारी पांडूरंग गुब्रे हे परीक्षा केंद्रावर अनुपस्थित होते. त्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने परीक्षा कामात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत संबंधित विभाग प्रमुखांना निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
परीक्षेची उपस्थिती
सकाळच्या रसायनशास्त्र पेपरसाठी एकूण 24,406 परीक्षार्थ्यांपैकी 24,073 विद्यार्थी उपस्थित राहिले असून उपस्थितीचे प्रमाण 98.64 टक्के नोंदविण्यात आले.
दुपारच्या राज्यशास्त्र विषयाच्या पेपरसाठी 13,207 पैकी 12,594 परीक्षार्थी उपस्थित होते. या सत्रातील उपस्थिती 95.36 टक्के होती.
वेबकास्ट, ड्रोन व कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण
सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांसह झूम वेबकास्ट, ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत देखरेख ठेवण्यात आली होती. या दरम्यान स्व. संगितादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दहेली तांडा (ता. किनवट) येथील केंद्रावर एक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी मंडळ नियमांनुसार कारवाई करून अहवाल मंडळाकडे पाठविला.
🔗 अशाच ताज्या घडामोडींसाठी वाचा 👉 लेटेस्ट न्यूज
याच केंद्रावर मंडळाच्या निर्देशानुसार उर्वरित प्रश्नपत्रिका सीसीटीव्ही निगराणीत ठेवण्यात न आल्याने, परीक्षार्थ्यांची योग्य तपासणी न झाल्याने तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त न मागवल्याने केंद्रसंचालक श्री. गुटटे यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश संबंधित शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले.
तसेच या केंद्राचे मूळ मुख्याध्यापक पांडूरंग आडे यांनी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यास अडथळा निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यासाठी संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांना कळविण्यात आले आहे.
इतर केंद्रांवरही कारवाई
संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय, पेठवडज (ता. कंधार) येथील परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी मंडळ नियमांनुसार कारवाई करून अहवाल सादर केला आहे.
दहेली तांडा आणि पेठवडज येथील केंद्रसंचालकांना तत्काळ बदलून त्यांच्या जागी इतर केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


