Girls Self Defense Training Maharashtra : राज्यातील मुलींना स्वसंरक्षणासाठी जूनपासून शाळांमध्ये लाठ्याकाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच ‘कमवा व शिका’ योजनेतून विद्यार्थ्यांना दरमहा 2 हजार रुपये मानधन देण्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे केली.


सांगली : राज्यातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी येत्या जून महिन्यापासून शाळांमध्येच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली. यासोबतच ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा २ हजार रुपये मानधन देण्याची घोषणाही त्यांनी केली. या निर्णयाचा राज्यभरातील विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत ५० शाळांमधील ३६ हजार मुलींना दर शनिवारी एक तास कराटे आणि ज्युडोचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी १५ हजार ४०० मुलींना पहिला ‘यलो बेल्ट’ देण्यात आला आहे. पुढील बेल्टसाठी लागणारे प्रशिक्षण शुल्क प्रशासनाकडून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री पाटील यांनी पुढे सांगितले की, जून महिन्यापासून राज्यातील प्रत्येक शाळेत मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठ्याकाठीचे प्रशिक्षण दिले जाईल. सध्या राज्यातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५ लाख मुलींना कॉलेज फी आणि वसतिगृह शुल्कातून सवलत देण्यात येत आहे. याशिवाय ‘कमवा व शिका’ योजनेतून त्यांना दरमहा २ हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह विविध अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
“माझे म्हातारपण सुखरूप जाईल” – खासदार पाटील
यावेळी खासदार विशाल पाटील यांनीही कार्यक्रमाला संबोधित करताना मुलींसाठी आयोजित मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणाचे कौतुक केले. “मला दोन मुली आहेत. मुलींचे हे कराटे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल, असा विश्वास वाटतो,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


