mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

इराणवरील हल्ल्याचा निषेध; अकोल्यात कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने | Protest Against Iran Attack in Akola

शेअर करा :

Protest Against Iran Attack in Akola : अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व ऑल इंडिया युथ फेडरेशनकडून निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत भारत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

Protest Against Iran Attack in Akola
अकोला : आंतरराष्ट्रीय शांततेच्या समर्थनार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व ऑल इंडिया युथ फेडरेशनतर्फे अकोल्यात निदर्शने करून अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत भारत सरकारने अमेरिकेच्या युद्धखोर भूमिकेला विरोध करावा, अशी मागणी करण्यात आली.

👉 अकोलासह परिसरातील ताजा घडामोडींसाठी वाचा : विदर्भ

कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि कॉम्रेड रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आंदोलनातून जनजागृती करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका-इस्रायलने इराण या सार्वभौम राष्ट्रावर केलेला हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून तो साम्राज्यवादी व युद्धखोर आक्रमण आहे. या कारवाईमुळे मध्यपूर्वेतील प्रादेशिक स्थैर्य धोक्यात येत असून भारताच्या राष्ट्रीय हितालाही त्याचा परिणाम होऊ शकतो. निवेदनानुसार, इराण हा अनेक शतकांपासून भारताशी मैत्रीपूर्ण संबंध राखणारा देश आहे. भारत-इराण ऊर्जा कॉरिडॉर आणि गॅस पाइपलाइनसारखे प्रकल्प अमेरिकेच्या दबावामुळे थांबले, तर चाबहार बंदर प्रकल्पही त्याच कारणामुळे मागे पडल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच भारताने अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण कायम ठेवून कोणत्याही लष्करी युतीपासून दूर राहावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी कॉम्रेड नयन गायकवाड, कॉम्रेड मायावती बोरकर, कॉम्रेड सविता प्रधान, कॉम्रेड प्रीती नायसे, कॉम्रेड माधुरी पवार, कॉम्रेड भारती बसेरे, कॉम्रेड पुनम, कॉम्रेड शालिनी, कॉम्रेड कंचन सरदार, कॉम्रेड सागर निंबाळकर आदी उपस्थित होते. याबाबतची माहिती कॉम्रेड पूनम खोब्रागडे यांनी दिली.

Protest Against Iran Attack in Akola

आखाती देशांतील भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा

आंदोलनकर्त्यांनी निवेदनात आखाती प्रदेशात काम करणाऱ्या सुमारे ९५ लाख भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. वाढत्या युद्धपरिस्थितीमुळे या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

👉 जगभरातील ताजा घडामोडींसाठी वाचा : विश्व

आर्थिक परिणामांबाबत चिंता

युद्धपरिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असून त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. तेलाच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असून सरकारने रशियासारख्या देशांशी चर्चा करून सवलतीच्या दरात कच्चे तेल उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय युद्धपरिस्थितीमुळे बासमती तांदूळ, साखर, कांदा, केळी, द्राक्षे यांसारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम होत असल्याने शेतकरी व लघुउद्योगांना आर्थिक फटका बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. प्रभावित शेतकरी आणि उद्योगांना आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको