mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ | Jishnu Dev Varma Maharashtra Governor

शेअर करा :

Jishnu Dev Varma Maharashtra Governor : मुंबईतील लोकभवनात जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या २२ व्या राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्यातील जिष्णू देव वर्मा यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास जाणून घ्या.

Jishnu Dev Varma Maharashtra Governor

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवनातील दरबार सभागृहात झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

👉 राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी वाचा : राजकारण

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा? Jishnu Dev Varma

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत. भारतातील सर्वात प्राचीन राजघराण्यांपैकी एक असलेल्या या घराण्याने प्रगत विचारसरणीचा वारसा जपला आहे.

Jishnu Dev Varma Maharashtra Governor

१९४१ मध्ये त्रिपुरासाठी पहिली लिखित राज्यघटना लागू करून नागरिकांमध्ये स्वावलंबन, सहकार्य आणि राज्यनिष्ठा यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या राज्यघटनेत अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि कामगारांसाठी विधानसभेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती.

👉 राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र

राजकीय प्रवास

जिष्णू देव वर्मा यांनी १९९३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते त्रिपुराच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी त्रिपुरा प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणूनही काम केले.

२०१८ मध्ये त्यांनी १९ चारिलाम (अनुसूचित जमाती) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून तब्बल ८९.३३ टक्के मते मिळवत विजय मिळवला.

त्या वर्षी त्रिपुरात २५ वर्षांच्या डाव्या आघाडीच्या सत्तेनंतर भाजप सरकार सत्तेत आले आणि जिष्णू देव वर्मा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी वित्त, ग्रामीण विकास आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.

विकासाभिमुख उपक्रम

त्यांच्या कार्यकाळात विविध विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. Bio Village 2.0 हा त्यांचा एक अभिनव उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला.

या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी, ऊर्जा आणि उपजीविकेच्या क्षेत्रात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना देण्यात आली. समुदायाच्या सक्रिय सहभागामुळे हा प्रकल्प यशस्वी ठरला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला मान्यता मिळाली.

ईशान्य भारताच्या विकासात भूमिका

ईशान्य भारताच्या विकासासाठी धोरणनिर्मितीतही जिष्णू देव वर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९८९ ते १९९३ या काळात ते नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या सल्लागार समितीचे सदस्य होते.

त्यांनी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) च्या त्रिपुरा विभागाचे संयोजक म्हणूनही काम केले.

कला, साहित्य आणि सर्जनशीलता

जिष्णू देव वर्मा हे राजकारणासोबतच कला, साहित्य आणि संस्कृतीशी घट्ट जोडलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड आहे. त्यांच्या कलाकृती विविध पर्यटनस्थळे, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

ते एक कवी आणि लेखकही आहेत. बंगाली आणि इंग्रजी भाषेतील त्यांच्या कविता प्रसिद्ध असून Children of Water Goddess आणि Master of Time ही त्यांची पुस्तके विशेष चर्चेत आहेत.

तेलंगणाहून महाराष्ट्रात राज्यपालपद

३१ जुलै २०२४ रोजी जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.

आपल्या स्नेहपूर्ण स्वभावामुळे ते सर्व स्तरांतील लोकांशी सहज संवाद साधणारे आणि सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध राहणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. समाजातील वंचित घटकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे हेच जीवनाचे खरे सार्थक असल्याचे ते मानतात.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको