Parbhani fertilizer shop license suspended : परभणी जिल्ह्यात नियमभंग करणाऱ्या ९ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित; कृषी विभागाची मोठी कारवाई, शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर निर्णय.


परभणी : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने मोठी कारवाई करत नियमभंग करणाऱ्या ९ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच, अन्य २ परवानाधारकांना कडक समज देण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान संबंधित केंद्रचालकांनी सादर केलेले खुलासे समाधानकारक न ठरल्याने ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक गंभीर अनियमितता उघडकीस आल्या.
काही विक्रेत्यांनी ई-पॉस यंत्रणेतील व्यवहारांमध्ये तफावत ठेवत कंपन्यांकडून प्राप्त ‘अॅकनॉलेजमेंट’ वेळेत स्वीकारले नव्हते. याशिवाय, नोंदणीकृत साठा आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी विसंगती आढळली. शासनाच्या नियमांनुसार आवश्यक असलेले भावफलक व साठाफलक अद्ययावत न ठेवणे, शेतकऱ्यांना खरेदीनंतर पक्की देयके न देणे तसेच बिलांवर स्वाक्षरी न घेणे अशा त्रुटीही आढळून आल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या कारवाईद्वारे सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना कडक इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले. भविष्यात अशा अनियमितता पुन्हा आढळल्यास संबंधितांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


