Saqib Hussain IPL 2026 No Sixes 72 Balls : आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज साकिब हुसेन चमकला. पदार्पणात ४ विकेट्स आणि ७२ चेंडूत एकही षटकार नाही; क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले.


हैदराबाद : टी-२० क्रिकेट म्हणजे फलंदाजांचा जल्लोष आणि गोलंदाजांची कसोटी, असे चित्र नेहमी पाहायला मिळते. मात्र, या साच्यातून बाहेर पडत यंदाच्या आयपीएलमध्ये एका तरुण गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या बिहारच्या साकिब हुसेनने आपल्या अचूक आणि प्रभावी गोलंदाजीने क्रिकेटविश्वात ठसा उमटवला आहे.
👉 हे देखील वाचा : खाशाबा जाधवांना पद्मविभूषण देण्याबाबत केंद्राला ४ मेपर्यंत निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचे निर्देश
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात साकिबने केवळ २४ धावा देत ४ बळी टिपले आणि पदार्पणातच दमदार कामगिरी करत नवा इतिहास रचला. गोपाळगंज (बिहार) येथील २१ वर्षीय साकिबला आयपीएल २०२६ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने ३० लाख रुपयांना संघात घेतले होते.
दिग्गजांच्या यादीत साकिबची एन्ट्री
पदार्पणाच्या सामन्यात ४ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा साकिब हा आयपीएल इतिहासातील सातवा खेळाडू ठरला आहे. पदार्पणातील सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत त्याने अश्वनी कुमारसह संयुक्त पाचवे स्थान पटकावले आहे. या यादीत अलझारी जोसेफ, अँड्र्यू टाय आणि शोएब अख्तर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
७२ चेंडूत एकही षटकार नाही!
टी-२० फॉर्मेटमध्ये जिथे प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळले जातात, तिथे साकिब हुसेनने आतापर्यंत टाकलेल्या ७२ चेंडूंमध्ये एकाही फलंदाजाला षटकार मारू दिलेला नाही. ही बाब त्याच्या अचूक लाईन-लेंथ आणि नियंत्रणाची साक्ष देते.
KKR मधून SRH पर्यंतचा प्रवास
२०२४ च्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने साकिबला संघात घेतले होते, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला संघातून मुक्त करण्यात आले. मात्र, २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने संधी दिल्यावर त्याने ती दोन्ही हातांनी स्वीकारली.
👉 क्रीडा क्षेत्रातील ताजा घडामोडी वाचा : क्रीडा
पुढील लक्ष्य काय?
साकिबच्या आतापर्यंतच्या कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये त्याची तुलना जसप्रीत बुमराहशी केली जात आहे. आयपीएलमधील पुढील सामन्यांमध्ये त्याची कामगिरी कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


