Akola Water Supply Jigao Project 2026 : अकोला शहराला जीगाव प्रकल्पातून २८ एमएलडी पाणीपुरवठा होणार. दीड वर्षात १३ नवीन पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार; पाणीप्रश्नावर मोठा दिलासा.


अकोला : शहराच्या पाणी प्रश्नावर मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या दीड वर्षात बुलढाणा जिल्ह्यातील जीगाव प्रकल्पातून अकोला शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पाअंतर्गत शहरात १३ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत.
👉 हे देखील वाचा : मालमत्ता करातील कचरा संकलनाचे ६०० रुपये रद्द करा; अन्यथा उध्दवसेनेकडून जनआंदोलन
जीगाव प्रकल्पातून शहराला दररोज सुमारे २८ एमएलडी पाणी मिळणार असून, त्यासाठी निमकर्दा येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. नवीन टाक्यांमुळे पाण्याचा साठा वाढणार असून, वितरण व्यवस्थाही अधिक सुटसुटीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या पत्रकार परिषदेत महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेता पवन मोहल्ले, भाजप नगराध्यक्ष जयंत मसने तसेच नगरसेवक नितीन ताकवाले उपस्थित होते.
स्वच्छता अभियान आणि नदी स्वच्छतेत ८५% काम पूर्ण
भारतीय जनता पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील सर्व प्रभागात स्वच्छता अभियान सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
कचरा शुल्क ६०० रुपये; कर वाढणार नाही
कचरा संकलनासाठी वार्षिक ६०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, ते घरपट्टीमध्ये समाविष्ट असेल. प्रशासकीय कालावधीत नेमलेल्या कंत्राटदाराच्या कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने त्यांचे काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पुढील पाच वर्षांत कोणत्याही प्रकारचा टॅक्स वाढवला जाणार नाही, अशी ग्वाहीही सभापती विजय अग्रवाल यांनी दिली.
ई-बस चार्जिंग सेंटरचे काम अंतिम टप्प्यात
अकोला शहरात खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नातून ई-बस सुविधा उपलब्ध झाली आहे. या बससाठी आवश्यक असलेले चार्जिंग सेंटरचे बांधकाम आणि इतर कामे येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली.
👉 हे देखील वाचा : ‘संपा’त अडकलेलं लग्न… अखेर जिंकली माणुसकी; अकोल्यातील विवाहाची हृदयस्पर्शी कहाणी
जीगाव प्रकल्पामुळे अकोला शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. त्यासोबतच स्वच्छता, वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू असल्याचे या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


