Balapur house fire incident : बाळापूरच्या गुजराथीपुरा भागात भीषण आगीत संतोष गोरे यांचे घर जळून खाक; ४-५ लाखांचे नुकसान, उपजीविकेचे साधनही नष्ट.


बाळापूर : कष्टाने उभे केलेले घर आणि संसार एका क्षणात जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना बाळापूर शहरातील गुजराथीपुरा भागात घडली. संतोष प्रल्हाद गोरे यांच्या घराला गुरुवारी रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागून अवघ्या काही महिन्यांपूर्वी ‘प्रधानमंत्री आवास योजने’तून उभारलेले त्यांचे घर पूर्णपणे जळून गेले.
👉 हे देखील वाचा : अक्षय तृतीयेआधी अॅक्शन; बाभुळगावात बालविवाह रोखला, प्रशासनाचा सतर्क
मोठ्या आशेने उभे केलेल्या घरात सुखाने राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गोरे कुटुंबाला डोळ्यादेखत आपले घर राख होताना पाहावे लागले. आगीत रोख ४० हजार रुपये, अन्नधान्य, फर्निचर, कपडे, साड्या आणि संपूर्ण इलेक्ट्रिक फिटिंग जळून खाक झाले. एकूण सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्परतेने धाव घेत घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा स्फोट टळून जीवितहानी टळली. मात्र या घटनेत संतोष गोरे यांचा मुलगा किरकोळ भाजला आहे.
पानटपरी चालवणारे संतोष गोरे आणि शिलाई काम करणाऱ्या त्यांची पत्नी सपना गोरे यांचा संसार या आगीत उद्ध्वस्त झाला. उपजीविकेचे मुख्य साधन असलेली शिलाई मशीन आणि ग्राहकांच्या साड्याही आगीत जळून गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला आहे.
👉 हे देखील वाचा : खिरपुरी बु. मध्ये पाण्याच्या टाकीत आढळले मृत माकड
घटनेनंतर तलाठी भानुदास मस्के यांनी पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठवला असून बाळापूर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.
संसार, घर आणि रोजगार एका क्षणात हिरावून घेतलेल्या या घटनेनंतर गोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
👉 अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ


