Indian Railways Expansion 2025 : केंद्र सरकारने २०२५-२६ मध्ये ६,००० किमी रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देत भारतीय रेल्वेचा मोठा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १.५३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विस्तारीत १०० प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटी व मालवाहतूक सुधारणा होणार आहे.


नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराला मोठी गती देत केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षात सुमारे ६,००० किमी लांबीच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी एकूण १.५३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेची कनेक्टिव्हिटी व मालवाहतूकीत सुधारणार होणार आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ
अधिकृत माहितीनुसार, यंदा एकूण १०० रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात ६४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार, प्रकल्प संख्येत ५६ टक्के, मार्ग विस्तारामध्ये ११४ टक्के, तर गुंतवणुकीत ११० टक्क्यांपेक्षा जास्त लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.
नवीन मार्ग, डबलिंग व मल्टीट्रॅकिंगवर भर
मंजूर प्रकल्पांमध्ये नवीन रेल्वेमार्ग उभारणी, डबलिंग, मल्टीट्रॅकिंग, तसेच बायपास आणि फ्लायओव्हर लाईनचा समावेश आहे. यामुळे गर्दीच्या मार्गांवरील ताण कमी होऊन रेल्वे वेळापत्रकात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांना प्राधान्य
या प्रकल्पांचा विस्तार देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये होणार असून, महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या राज्यांमध्ये मालवाहतूक, औद्योगिक जोडणी आणि प्रवासी वाहतूक सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्ये वाढ
या उपक्रमांतर्गत १ हजार कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या ३५ प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये कसारा–मनमाड मार्ग विस्तार, खरसिया–नया रायपूर–परमलकासा, इटारसी–नागपूर, सिकंदराबाद – वाडी या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे.
मालवाहतूक व लॉजिस्टिक्सवर भर
हे प्रकल्प रेल्वेच्या मालवाहतूक क्षमतेत वाढ करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कोळसा, खनिज वाहतूक आणि बंदर कनेक्टिव्हिटी सुधारून लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
दुर्गम भागांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार
पीएम गती शक्ती राष्ट्रीय आराखड्याअंतर्गत आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये रेल्वे पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे बाजारपेठ, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना
या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मिती, औद्योगिक मागणी आणि देशाच्या आर्थिक वाढीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
रेल्वे प्रकल्पांवरील सविस्तर बातम्या येथे वाचा


