Akola Crime Branch Robbery Gang Arrested : अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली. पिस्टल, जिवंत काडतुसे, चाकू आणि महिंद्रा XUV 500 कारसह १०,५९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी फरार.


अकोला : स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या सतर्कतेमुळे शहरात घडू शकणारी एक मोठी गुन्हेगारी घटना टळली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीतील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून पिस्टल, चाकू, शस्त्रे आणि कारसह एकूण १०,५९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही संशयित आरोपी वाशीम बायपासजवळील अंबिका नगर रस्त्यावर महिंद्रा एक्सयुव्ही ५०० कारची नंबर प्लेट बदलून उभे आहेत. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले, तर दोन आरोपी फरार झाले. आरोपी आणि वाहनाची झडती घेतली असता एक गावठी बनावटीची पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक चाकू, एक लोखंडी आरी, चेहरा झाकण्यासाठी मास्क, हँडग्लोज, तीन मोबाईल, कारमध्ये असलेल्या खोट्या नंबर प्लेट्स आणि महिंद्रा XUV 500 कार असा एकूण १०,५९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपींच्या हालचाली, शस्त्रसज्जता, वाहनाचा वापर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ते अकोल्यात मोठा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होते, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा गुन्हा टळला. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (४), ३१० (५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती करीत आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी
निहाल अहमद फिरोज अहमद (वय २६, रा. अलकरीम नगर, वलगाव रोड, अमरावती)
सैय्यद अली सैय्यद अनिस (वय २२, रा. जमजम नगर, खामगाव रोड, शेगाव, जि. बुलढाणा)
शेख इल्यास शेख अयाज (वय २५, रा. देशपांडे प्लॉट, वाशीम बायपास, अकोला)
तसेच जुनेद (पूर्ण नाव माहीत नाही, रा. अमरावती) आणि एक अनोळखी व्यक्ती फरार आहे.
आरोपींनी यापूर्वी केले होते व्यापाऱ्याचे अपहरण
तपासादरम्यान आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले असता, त्यांनी १९ ऑगस्ट २०२५ रोजी मलकापूर (जि. बुलढाणा) येथून एका व्यापाऱ्याचे २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. त्यावेळी राजस्थानमधील कोटा येथे स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान आरोपींना पकडून व्यापाऱ्याची सुटका केली होती आणि त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल जप्त करण्यात आल्या होत्या.
तसेच आरोपी शेख इल्यास शेख अयाज याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद असून त्याला २०२२ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, सहा. पो. उप. नि. गणेश पांडे तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनुने, वसीमोद्दीन, एजाज अहमद, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, राजसिंह चंदेल, अभिषेक पाठक, आकाश मानकर, श्रीकांत पातोंड, अशोक सोनवणे, अमोल दिपके आणि चालक ग्रेड पो. उप. नि. विनोद ठाकरे व देवानंद खरात यांनी सहभाग घेतला.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


