Akola Additional Collector extortion case : अकोल्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्ध 15 हजार रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल. एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गायकवाड सक्तीच्या रजेवर.


अकोला : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या स्टोन क्रशर व्यावसायिक आणि प्रशासनातील वादाला अखेर गुन्हेगारी वळण लागले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्ध खंडणीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
👉 हे देखील वाचा : अकोला 44°C सह जगात दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर; राज्यात हीटवेव्ह, सरकारचा सतर्क
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक २७०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२), ३५१ (१) BNS तसेच PCA कायद्याच्या कलम ७ अन्वये ही नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात स्टोन क्रशर व्यवसायिक विवेक प्रभाकर बिजवे (वय ६२) यांनी फिर्याद दिली आहे.


नेमका आरोप काय?
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी बार्शी टाकळी येथील बीके चौक, एमआयडीसी ३ परिसरात जात असताना प्रमोद गायकवाड यांनी बिजवे यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. केवळ त्यांच्याकडूनच नव्हे, तर इतर सदस्यांकडूनही समान रकमेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
👉 जिल्ह्यासह राज्यातील गुन्हे वार्ता वाचा : गुन्हे
भीतीपोटी तक्रारदाराने संबंधित रक्कम गायकवाड यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन दिल्याचे म्हटले आहे. यानंतर १ एप्रिल २०२६ रोजी फोनवरून पुन्हा धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप पुराव्यादाखल सादर करण्यात आली आहे.
९ दिवसांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल
या तक्रारीवरून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला होता. तब्बल नऊ दिवसांच्या चौकशीनंतर पुरावे आणि जबाबांच्या आधारे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. आठवडाभरापूर्वीच खाण व स्टोन क्रशर मालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.
प्रशासनाची तात्काळ कारवाई
गुन्हा नोंदविल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलत प्रमोद गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. पुढील टप्प्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार का, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गायकवाड यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, प्रमोद गायकवाड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत, आपण केवळ रॉयल्टी वसुलीसाठी दबाव टाकला होता, असा दावा केला आहे.
या प्रकरणामुळे प्रशासन आणि व्यावसायिक यांच्यातील तणाव अधिकच तीव्र झाला असून, पुढील तपासात नेमके सत्य समोर येणार आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
👉 हे देखील वाचा : लाडकी बहीण योजना: आता QR कोडद्वारे ई-केवायसी; नागपुरात विशेष मोहीम सुरू


