Child marriage stopped Akola : अकोला जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; बाभुळगावात बालविवाह रोखला. बालविवाह केल्यास गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा.


अकोला : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून नियमभंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिला आहे. या सतर्कतेदरम्यान पातुर तालुक्यातील बाभुळगाव येथे होऊ घातलेला एक बालविवाह पोलिस व बाल कल्याण समितीच्या संयुक्त कारवाईत थांबविण्यात आला.
👉 हे देखील वाचा : खिरपुरी बु. मध्ये पाण्याच्या टाकीत आढळले मृत माकड
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अक्षय तृतीया हा विवाहासाठी शुभ मुहूर्त मानला जात असल्याने या काळात बालविवाह होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सर्व यंत्रणांनी दक्ष राहून अशा घटनांना आळा घालावा. मुलांचे किमान वय २१ वर्षे व मुलींचे १८ वर्षे निश्चित असून त्यापेक्षा कमी वयात विवाह झाल्यास तो बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा ठरतो. या कारवाईमुळे प्रशासनाची सतर्कता स्पष्ट झाली असून, अक्षय तृतीयेच्या काळात बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कायदा काय सांगतो?
बालविवाह झाल्यास संबंधित मुलामुलींचे पालक, नातेवाईक, विवाह आयोजक, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक तसेच विवाह विधी पार पाडणाऱ्यांवरही गुन्हे दाखल होऊ शकतात. या गुन्ह्यासाठी २ लाख रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते.
👉 हे देखील वाचा : ‘ऑपरेशन प्रहार’ : अकोल्यात १३.८० लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त; एक जेरबंद
बाभुळगावात तात्काळ कारवाई
१६ एप्रिल रोजी बाभुळगाव येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पातुर पोलीस, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व बाल कल्याण समितीने घटनास्थळी धाव घेतली. मुलीच्या जन्मतारखेची पडताळणी केल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आणि विवाह तत्काळ थांबविण्यात आला. त्यानंतर पालकांना कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तक्रार कुठे कराल?
गावात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस हेल्पलाईन ११२ या क्रमांकावर त्वरित कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


