Marriage Registration Delay Strike Akola Story : अकोल्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विवाह नोंदणी रखडली; दिवसभर प्रतीक्षेनंतर प्रशासन व समाजकार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अखेर विवाह पार पडला. दोन कुटुंबांना नवजीवन देणारी हृदयस्पर्शी घटना.


अकोला : एका लग्नासाठी सगळं काही ठरलेलं… वऱ्हाड पोहोचलेलं… पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उपनिबंधक कार्यालय बंद आणि लग्न अडकलेलं! अकोल्यात घडलेली ही घटना सुरुवातीला त्रासदायक ठरली, मात्र शेवटी ती दोन कुटुंबांना नवजीवन देणारी प्रेरणादायी कहाणी बनली.
👉 हे देखील वाचा : राज्यात आजपासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; शासनाचा शिस्तभंग कारवाईचा इशारा
बार्शी येथून आलेल्या वरपक्षासह सुमारे ५० ते ७० वऱ्हाडी दिवसभर अकोल्यात प्रतीक्षेत होते. वधू हर्षा आणि वर रविकांत लांडे यांच्या विवाह नोंदणीसाठी दीड महिन्यांपूर्वीच तारीख निश्चित झाली होती. मात्र, संपामुळे कार्यालय बंद असल्याने नियोजित वेळेत विवाह नोंदणी होऊ शकली नाही. वधू-वरांसह दोन्ही कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला.
दिवसभराची प्रतीक्षा आणि वाढता ताण
या अनपेक्षित अडचणीमुळे वधू-वर पक्षातील मंडळींनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेतली. त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, तरी काही काळ अनिश्चितता कायम राहिली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण दिवसभर प्रतीक्षेत थांबले होते. “लग्नात विघ्न” ही म्हण अक्षरशः खरी ठरल्याची चर्चा शहरात रंगली.
दोन दुःखांनी जोडलेलं नातं
या लग्नामागची कहाणी मात्र अधिक भावनिक आहे. वर गोविंद लांडे (बार्शी) यांची पत्नी दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन पावली होती आणि त्यांच्या दोन लहान मुलांना आईची माया मिळत नव्हती. तर वधू ही अकोल्यातील बंडूसा घाटोळे यांची कन्या असून तिच्या पतीचे अकरा महिन्यांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले होते. तिचा दहा वर्षांचा मुलगा वडिलांच्या छायेशिवाय वाढत होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा आधार बनण्याचा निर्णय घेतला होता.
प्रयत्नांना यश; अखेर विवाह पार
या कठीण परिस्थितीत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानंतर आणि विदर्भ भावसार समाजाचे अध्यक्ष अनिल मावळे यांच्या मध्यस्थीमुळे अखेर अडथळे दूर झाले. अकोल्यातील उपनिबंधक कार्यालयात विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पडला आणि दोन्ही कुटुंबांना दिलासा मिळाला.
संकटातून उभा राहिलेला संदेश
संप, अडथळे आणि ताणतणाव यावर मात करत पार पडलेला हा विवाह केवळ एक घटना नाही, तर समाजाला दिशा देणारा संदेश आहे. संकट कितीही मोठं असलं, तरी मानवी संवेदना, एकजूट आणि प्रयत्न असतील तर मार्ग नक्की निघतो—अकोल्यातील ही घटना त्याचं जिवंत उदाहरण ठरली आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
👉 अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ


