mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

Murtizapur Andhashraddha Case | निंभा गावात अघोरी उपचाराचा व्हिडिओ व्हायरल, चेतन महाराज अडचणीत

शेअर करा :

Murtizapur Andhashraddha Case : मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा गावात अंधश्रद्धेच्या नावाखाली चिमुकल्यावर अघोरी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. व्हायरल व्हिडिओनंतर चेतन महाराज मुळे यांच्यावर गुन्हा दाखल.

Murtizapur Andhashraddha Case

मूर्तिजापूर (जि. अकोला) : तालुक्यातील निंभा गावात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका चिमुकल्याच्या जीवाशी खेळ केल्याचा गंभीर प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे उघडकीस आला असून, त्यामध्ये लहान मुलावर कोणत्याही वैद्यकीय उपचारांशिवाय अघोरी पद्धतीने उपचार केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती चिमुकल्याला दातात पकडून अघोरी कृत्य करत असल्याचे दृश्य समोर आले आहे. हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा असल्याचा दावा पोलिसांनी केला असला, तरी अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

👉 हे देखील वाचा : परतवाडा प्रकरणात आरोपी अयान अहमद ताब्यात; मोबाईल जप्त, डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू

दरम्यान, देव-देवी अंगात येत असल्याचे भासवून अघोरी दरबार भरवणाऱ्या स्वयंघोषित चेतन महाराज मुळे याच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत विविध आजारांवर उपचार करण्याचे आश्वासन देत तो लहान मुलांवर अघोरी पद्धतींचा वापर करत असल्याची बाब समोर आली आहे.

तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अकोला येथील बालकल्याण समितीच्या सदस्या प्रांजली जयस्वाल यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री चेतन महाराज मुळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी यापूर्वीच १६ एप्रिल रोजी संबंधितांना नोटीस बजावली होती. निंभा येथील ‘बैरम बुवा’ संस्थानात धार्मिक विधीच्या नावाखाली विविध कार्यक्रम आयोजित होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल?

नोटीस देऊनही दर सोमवारी अघोरी दरबार सुरूच असल्याचे समोर आल्यानंतर अखेर २२ एप्रिल रोजी पोलिसांनी कठोर कारवाई केली.
यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, सहकलम जे.जे. अॅक्ट ७५ तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय, अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे देखील वाचा : गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; १२ शिकारी जेरबंद, शेकरूसह दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष जप्त

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा जीवघेण्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

प्रतिनिधी : महालोकवार्ता

👉 गुन्हे विषयक घडामोडींसाठी वाचा : गुन्हे 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको