Akola accident Babhulgaon car hits bike : अकोला एमआयडीसी हद्दीत बाभुळगावजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने रविंद्र अढाव यांचा मृत्यू, तर मुलगा पियुष गंभीर जखमी. पोलिसांकडून पुढील तपास सुरू.


बोरगाव मंजू : अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर बाभुळगाव नजीक शनिवारी (दि. २ मे) सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
👉 हे देखील वाचा : मेडशी बायपास अपघात : १० महिला मजूर गंभीर जखमी | कारने मॅक्झिमोला धडक
या अपघातात रविंद्र रामकृष्ण अढाव (वय ५०, रा. पातुर्डा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा पियुष रविंद्र अढाव (वय १७) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र अढाव हे आपल्या मुलासह मोटारसायकल (क्र. एमएच २८ ओव्ही ६१२८) वरून वाशिंबा येथून अकोल्याकडे येत होते. दरम्यान, बाभुळगावजवळील जवाहर नवोदय विद्यालयाजवळ पाठीमागून येणाऱ्या कार (क्र. जीजे २६ एई ९०७३) चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत वडील व मुलगा दोघेही सुमारे ८ ते १० फूट फरफटत गेले आणि गंभीर जखमी झाले.


अपघातानंतर कार चालकाने दोघांनाही तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रविंद्र अढाव यांना मृत घोषित केले.
👉 हे देखील वाचा : वाडेगावजवळ भीषण अपघात; दुचाकी-चारचाकी धडकेत तिघे गंभीर
घटनेची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी इशानी आनंद, पोलीस उपनिरीक्षक स्वाती वानखडे, हेडकॉन्स्टेबल सचिन धनबहादुर, अशोक मराठे व संतोष डाबेराव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
— प्रतिनिधी महालोकवार्ता


