Malkapur APMC farmers protest : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन. मका बाहेर उभा, बाजारात व्यापाऱ्यांची दादागिरी आणि सुविधांचा अभाव यावर किसान ब्रिगेडचा आक्रोश.


मलकापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरसोयी आणि अडते व्यापाऱ्यांच्या दादागिरीविरोधात मलकापूर येथे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. १५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजल्यापासून किसान ब्रिगेड आणि शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
👉 हे देखील वाचा : बुलढाण्यात युवकाची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी फरार, शहरात खळबळ
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “बाजार समिती ही शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची?” असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला मका बाजार समितीच्या बाहेरच उभा ठेवावा लागत असल्याने नाराजी वाढली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल मात्र बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.


या आंदोलनात किसान ब्रिगेडचे संभाजी शिर्के, शेतकरी संघटनेचे निलेश नारखेडे, तसेच जिल्हाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मूलभूत सुविधांचा अभाव
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी बाजार समितीतील विविध समस्यांचा पाढा वाचला.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
कॅन्टीनची सुविधा उपलब्ध नाही.
जेवणासाठी योग्य जागा नाही.
स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था.
साफसफाईचा अभाव.
👉 हे देखील वाचा : अकोला 44°C सह जगात दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर; राज्यात हीटवेव्ह, सरकारचा सतर्क
या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला.


सचिवांना आणून सुनावले
आंदोलनाची तीव्रता वाढताच किसान ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे सचिव यांना प्रत्यक्ष बाजार समितीत आणून त्यांच्यासमोरच शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.
मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही
“जोपर्यंत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल उचलला जात नाही आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
या आंदोलनामुळे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता
👉 बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ


