mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

करवंड महोत्सव 2026: शिवराय-गुणवंताबाई विवाह स्मृतीनिमित्त भव्य ऐतिहासिक सोहळा | Karvand Festival 2026 Buldhana

शेअर करा :

Karvand Festival 2026 Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील करवंड येथे १५ एप्रिल रोजी शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई यांच्या विवाहाच्या ३७० व्या स्मृतीनिमित्त ऐतिहासिक करवंड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Karvand Festival 2026 Buldhana

सिंदखेडराजा (बुलढाणा) : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि करवंड येथील महाराणी गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाहाला ३७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने, चिखली तालुक्यातील बावन बुर्जी येथे १५ एप्रिल रोजी ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मराठी संस्कृती, शिवकालीन इतिहास आणि परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी एक अद्वितीय पर्व ठरणार आहे.

👉 हे देखील वाचा : मान्सून २०२६ अंदाज: देशात ९२ टक्के पावसाची शक्यता; एल निनोचा परिणाम कमी

या ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री प्रताप जाधव उपस्थित राहणार असून, उद्घाटन शिवेंद्रराजे भोसले आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री मकरंद आबा पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, तसेच आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, सिद्धार्थ खरात आणि मनोज कायंदे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

या महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष म्हणून आमदार श्वेताताई महाले पाटील जबाबदारी सांभाळत असून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साकारला जात आहे. करवंड महोत्सव २०२६ हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून, शिवकालीन इतिहास, परंपरा आणि मराठी अस्मितेचा भव्य उत्सव ठरणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न होत आहे.

ऐतिहासिक शोभायात्रेतून शिवकालीन वैभवाचा अनुभव

महोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अभिषेकाने होईल. त्यानंतर ८ ते १० या वेळेत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, यात लेझीम पथक, बँड, अश्वदल, पालखी आणि पारंपरिक वेशातील मावळ्यांचा सहभाग असेल.

👉 हे देखील वाचा : लाडकी बहीण योजना: आता QR कोडद्वारे ई-केवायसी; नागपुरात विशेष मोहीम सुरू

यासोबतच तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकला आणि अग्निकला अशा शिवकालीन युद्धकौशल्यांचे थरारक सादरीकरण करून उपस्थितांना इतिहासाचा जिवंत अनुभव दिला जाणार आहे.

शाहिरी, व्याख्यान आणि सांस्कृतिक पर्व

दुपारच्या सत्रात शिवशाहीर प्रवीणजी फणसे (मुंबई) यांचा पोवाडा कार्यक्रम रंगणार आहे. त्यानंतर प्रा. यशवंत गोसावी ऐतिहासिक विषयावर व्याख्यान देतील, तर शाहीर विक्रांत राजपूत (बुलढाणा) लोककलेच्या माध्यमातून वातावरण भारावून टाकतील.
सायंकाळी रामचंद्र पाटील (पुणे) ‘युगपुरुष शिवराय’ या विषयावर विचार मांडतील, तर डॉ. नम्रता भोसले-मोहिते (संभाजीनगर) ‘मराठकालीन स्त्री सामर्थ्य’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

‘मराठी पाऊल पडते पुढे’चा कलाविष्कार

महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ७ ते १० दरम्यान सादर होणार आहे. दिग्दर्शक उदय साटम (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ कलाकारांच्या सहभागातून शिवरायांच्या जीवनातील प्रसंग, युद्धे, गोंधळ, जोगवा आणि कोळीगीतांचे सजीव सादरीकरण होणार आहे.

ऐतिहासिक आतिषबाजी आणि विशेष आकर्षण

कार्यक्रमाची सांगता रात्री १० वाजता बावन बुर्जीवरून होणाऱ्या नयनरम्य बारूद आतिषबाजीने होणार आहे. याशिवाय प्राचीन शस्त्र व नाणी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, महिला बचत गटांचे स्टॉल्स, अशा विविध उपक्रमांमुळे महोत्सव अधिक आकर्षक ठरणार आहे.

वंशजांची उपस्थिती; शिवप्रेमींना आवाहन

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवरायांच्या महाराणींच्या घराण्यातील वंशज, तसेच इंगळे घराण्याचे वंशज हरी रुद्र प्रताप रुद्र माने-इंगळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महोत्सवाचे अध्यक्ष अरविंद बापू देशमुख आणि महोत्सव समितीने राज्यभरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

— प्रतिनिधी, महालोकवार्ता

👉 राज्यातील ताज्या घडामोडींसाठी वाचा : महाराष्ट्र

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको