Sericulture success story Wardha farmer : वर्धा जिल्ह्यातील घोराड येथील शेतकरी विवेक माहुरे यांनी रेशीम शेतीतून अडीच एकर क्षेत्रावर लाखोंचे उत्पन्न मिळवले. पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून नवा आदर्श.


वर्धा : पारंपारिक शेतीतील वाढता खर्च आणि अनिश्चित उत्पन्न यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडत असताना, सेलू तालुक्यातील घोराड येथील प्रयोगशील शेतकरी विवेक ज्ञानेश्वर माहूरे यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून यशाची नवी दिशा दाखवली आहे. केवळ अडीच एकर क्षेत्रावर त्यांनी दर्जेदार रेशीम कोषाचे उत्पादन घेत उल्लेखनीय उत्पन्न मिळवले असून, त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.
👉 हे देखील वाचा : 10वी शिक्षणावर उभा केला व्यवसाय; वनीता उराडे यांची प्रेरणादायी झेप
विवेक माहूरे पूर्वी कपाशी, सोयाबीन आणि तुर यांसारखी पारंपारिक पिके घेत होते. मात्र, वाढत्या खर्चामुळे आणि कमी उत्पन्नामुळे त्यांना आर्थिक समाधान मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधण्यास सुरुवात केली. बीकॉम शिक्षण आणि इंटरनेटचे ज्ञान असल्याने त्यांनी विविध माध्यमांद्वारे माहिती घेतली आणि २०१७ मध्ये रेशीम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.


मनरेगा योजनेच्या माध्यमातून एक एकर क्षेत्रावर त्यांनी रेशीम शेतीची सुरुवात केली. यासाठी तुती लागवड, किटक संगोपनासाठी शेड बांधकाम, आवश्यक साहित्याची व्यवस्था याबाबत रेशीम कार्यालयाकडून मार्गदर्शन घेतले. अंडीपुंज संगोपन करताना स्वच्छता, वेळेवर तुतीचा पाला देणे आणि तापमान नियंत्रण यावर विशेष लक्ष दिल्यामुळे त्यांच्या कोषांचा दर्जा अधिक सुधारला.
👉 हे देखील वाचा : चंद्रपूरमध्ये मानव अधिकार आयोगाचा दौरा; आदिवासी वनहक्कांचा सखोल आढावा
रेशीम शेतीतून लाखोंचा नफा
विवेक माहूरे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रेशीम शेती करत असून, मागील वर्षभरात त्यांनी ९ बॅचेस काढल्या. यामधून अंदाजे ७.५ लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी मिळवला आहे. चालू वर्षात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत त्यांनी ६५५.७९ किलो रेशीम कोष उत्पादन घेतले. हे कोष त्यांनी कर्नाटकातील रामनगरम मार्केटमध्ये विक्री करून सुमारे ४ लाख ७५ हजार ९६१ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सन २०२२-२३ मध्ये तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांना ‘रेशीम रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तरुण शेतकऱ्यांना संदेश
रेशीम शेती हा कमी कष्टात आणि शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याचे सांगत विवेक माहूरे यांनी तरुण शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीसोबत अशा जोडधंद्यांकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक एकर क्षेत्रात रेशीम शेतीचा प्रयोग करून आर्थिक स्थैर्य मिळवावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
— प्रतिनिधी महालोकवार्ता


