Chandrapur Forest Rights Survey : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे निरीक्षक आर. हेमंथ कुमार यांचा चंद्रपूर दौरा. सामूहिक वनहक्क, बांबू लागवड व आदिवासी विकास योजनांचा सखोल आढावा.


चंद्रपूर : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे विशेष निरीक्षक (आदिवासी कल्याण) आर. हेमंथ कुमार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क क्षेत्रांचा महत्त्वपूर्ण अभ्यास दौरा करून आदिवासी भागातील विविध प्रश्नांचा सखोल आढावा घेतला.
👉 हे देखील वाचा : १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला; पिंजर पोलिसांची तत्पर कारवाई
दौर्यादरम्यान हेमंथ कुमार यांनी चंद्रपूर व चिमूर तालुक्यातील सामूहिक वनहक्क क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था, जिल्हा व तालुका व्यवस्थापक यांची बैठक घेतली. या बैठकीत वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि प्रत्यक्ष भेट द्यावयाच्या ठिकाणांची माहिती जाणून घेतली.
मौजा महादवाडी (ता. चंद्रपूर) येथील सामूहिक वनहक्क क्षेत्राला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. वनहक्क क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देताना त्यांनी विविध सुविधांची पाहणी केली. यामध्ये फायर फायटिंग व्यवस्था, वसतीगृह, इंडक्शन किचन, पाणी शुद्धीकरण, डिजिटल लॅब, टिश्यू कल्चर लॅब, ऑडिटोरियम, सौर ऊर्जा व्यवस्था, संगणक लॅब, ग्रंथालय आणि आरोग्य सुविधा यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी पुढील महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यामध्ये फायर फायटिंग व्यवस्था अधिक तांत्रिक व अचूक करावी, बांबू लागवड व उत्पादनासाठी लघु व सूक्ष्म उद्योगांतर्गत नियोजन करावे, बफर झोनमधील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, बांबू आधारित कौशल्य विकास कार्यक्रम राबवावेत आदी सूचनांचा समावेश आहे.
पाचगावमध्ये वनहक्क क्षेत्राची पाहणी
यानंतर मौजा पाचगाव येथे भेट देऊन त्यांनी सामूहिक वनहक्क क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. येथे बांबू लागवड, कापणीची योग्य वेळ, आधुनिक साधनांचा वापर आणि संकलन प्रक्रिया याबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा केली.
👉 हे देखील वाचा : आपमध्ये फूट; राघव चड्ढांसह ७ खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश
“विकास आणि मानवाधिकार यांचा समतोल आवश्यक”
हेमंथ कुमार यांनी आदिवासी भागातील परिस्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यावर भर देत सांगितले की, “आदिवासी भागाचा विकास आणि मानवाधिकारांचे संरक्षण यामध्ये समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचणे ही प्राथमिकता आहे.”
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
गुरुवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.
बैठकीत पुढील बाबींचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आदिवासी भागातील विकासकामे, वनहक्क प्रकरणांची स्थिती, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांचे गठन, समित्यांची बँक खाती व आराखडे, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी आदींचा समावेश होता.
या दौऱ्यामुळे आदिवासी भागातील वनहक्क, विकासकामे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रत्यक्ष स्थिती समोर आली असून, यामुळे भविष्यात अधिक प्रभावी धोरणे आखण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
— प्रतिनिधी महालोकवार्ता
चंद्रपूरसह विदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ


