mahalokvarta.com

Maha Lokvarta Header

child marriage stopped akola barshitakli | १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला; पिंजर पोलिसांची तत्पर कारवाई

शेअर करा :

child marriage stopped akola barshitakli : अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यात १५ वर्षीय बालिकेचा २४ वर्षीय व्यक्तीसोबत होणारा बालविवाह संयुक्त पथकाने रोखला. पालकांकडून हमीपत्र घेत कारवाई.

child marriage stopped akola barshitakli
बार्शीटाकळी (जि. अकोला) : तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत १५ वर्षीय बालिकेचा २४ वर्षीय व्यक्तीसोबत होणारा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. एप्रिल महिन्यात तालुक्यात बालविवाहाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हा भाग ‘हायअलर्ट’वर असून, जवळपास एक दिवसाआड अशा घटनांची नोंद होत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन आणि सामाजिक संस्था ‘ॲसेस टू जस्टीस’ (आय.एस.डब्ल्यू.एस) अकोला यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

👉 हे देखील वाचा : अक्षय तृतीयेआधी अॅक्शन; बाभुळगावात बालविवाह रोखला, प्रशासनाचा सतर्क

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय बालिकेचा २४ वर्षीय व्यक्तीसोबत बालविवाह होणार असल्याचे समोर आले. यानंतर चाईल्ड लाईन समन्वयक हर्षाली गजभिये, ‘ॲसेस टू जस्टीस’ आय.एस.डब्ल्यू.एसचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप पाळवे आणि पिंजर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
बालविवाह हा सामाजिक कलंक असून कायदेशीर गुन्हा आहे. अशा प्रकारात सहभागी होणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहिती देत पालकांना सतर्क करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर शेषराव दराडे, महिला पोलीस शिपाई मनीषा संजय कांबळे, सरपंच, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांनीही या कारवाईत सहभाग घेतला. या संयुक्त पथकाच्या तत्परतेमुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले असून, परिसरात या कारवाईचे कौतुक होत आहे.

पालकांच्या बैठकीत प्रकरण उघड

पथकाने बालिकेच्या पालकांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून बैठक घेतली. यावेळी बालिकेच्या आईने माहिती दिली की, मुलीचे वडील दोन वर्षांपूर्वी निधन पावले असून, तीन मुलांची जबाबदारी आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे बालविवाह करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मुलगी व तिच्या भावंडांचे शिक्षणही खंडित झाल्याचे स्पष्ट झाले.

👉 हे देखील वाचा : अकोला मनपावर २४ गावांसाठी घागर मोर्चा; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र इशारा

बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती

पथकाने पालकांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत नियम समजावून सांगितले. मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे पूर्ण होणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बाल कल्याण समितीसमोर सुनावणी

हे प्रकरण अकोला येथील बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी दोन्ही बाजूंची बैठक घेऊन कडक इशारा दिला. अल्पवयात लग्न केल्यास मुलीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगत समुपदेशन करण्यात आले.
तसेच मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’ अंतर्गत मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले.

हमीपत्रावर सुटका

“मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न लावणार नाही,” असे कायदेशीर हमीपत्र दोन्ही बाजूंच्या पालकांकडून घेण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य साक्षीदार म्हणून उपस्थित होते.

तक्रारीसाठी हेल्पलाईन

बालविवाहाबाबत माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते. यासाठी
चाईल्ड लाईन – १०९८
पोलीस मदत – ११२
बचपन बचाव आंदोलन – १८००१०२७२२२
या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

— प्रतिनिधी महालोकवार्ता

👉 अकोल्यासह परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
ताज्या बातम्यांसाठी Mahalokvarta Notifications सुरू करा होय, सुरू करा नको