Women Reservation Bill India : अकोल्यात पत्रकार परिषदेत यशोमती ठाकूर यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप.


अकोला : केंद्र सरकारने १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी संसदेत मांडलेल्या १३१ व्या महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. इंडिया आघाडी व इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवत ते नामंजूर केले. दरम्यान, महिला आरक्षणाच्या नावाखाली देशातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा डाव केंद्र सरकार आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.
👉 हे देखील वाचा : महिला आरक्षणावरून भाजपावर काँग्रेसची टीका; परभणीत खा. रविंद्र चव्हाण यांचे वक्तव्य
अकोल्यातील स्वराज्य भवन येथे शुक्रवार २४ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या की, संसदेत विधेयक नामंजूर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राज्यभर फिरून या विधेयकाबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत आहेत. त्याच अनुषंगाने अकोल्यात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
त्या पुढे म्हणाल्या की, बंगाल, तामिळनाडू यांसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या असताना असे विधेयक संसदेत मांडणे चुकीचे आहे. २०२३ साली महिला आरक्षण विधेयक सर्वानुमते मंजूर झाले होते. मग पुन्हा नव्याने हे विधेयक का मांडण्यात आले, आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर याला परवानगी कोणी दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
👉 हे देखील वाचा : बुलढाणा दौऱ्यात श्याम मानवांचा आरोप: फडणवीसांनी अंधश्रद्धा वाढू दिली? ‘खरात’ प्रकरणावरून निशाणा
“नारी वंदना नाही, तर जागावाढीचा डाव”
विधेयकाचा सखोल अभ्यास केल्यास त्यामध्ये महिलांसाठी प्रत्यक्षात ‘नारी वंदना’ नसून लोकसभा जागा वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकार ५४३ जागांमध्ये वाढ करून लोकसभेच्या ८१५ जागा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ३५ जागा मिळून एकूण ८५० जागा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“निवडणुकीपूर्वी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न”
ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी भाजप या विधेयकाच्या माध्यमातून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असून हा एक ‘रडीचा डाव’ असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजा काळे, शहराध्यक्ष कशीश खान, माजी आमदार बबनराव चौधरी, डॉ. सुधीर ढोणे, प्रकाश तायडे, महेश गणगणे, इंटक नेते प्रदीप वखारिया, प्रदेश सचिव अक्षय राऊत, नगरसेवक आकाश कवडे, निलोफर खान आदी उपस्थित होते.
— प्रतिनिधी महालोकवार्ता


