women reservation bill congress bjp criticism : परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत खा. रविंद्र चव्हाण यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली. परिसीमनाच्या आरोपांसह काँग्रेसची भूमिका स्पष्ट.


परभणी : केंद्रातील भाजपा सरकार महिला आरक्षण विधेयकाच्या आडून लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खा. रविंद्र चव्हाण यांनी केला. जनगणना होण्यापूर्वी कोणतेही स्पष्ट नियोजन नसताना इतर राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला जात असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
👉 हे देखील वाचा : बुलढाणा दौऱ्यात श्याम मानवांचा आरोप: फडणवीसांनी अंधश्रद्धा वाढू दिली? ‘खरात’ प्रकरणावरून निशाणा
परभणी शहरातील सिटी पॅलेस सभागृहात जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, २२ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महिला आरक्षण विधेयकासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“भाजपाचे षडयंत्र विरोधकांनी हाणून पाडले”
खा. रविंद्र चव्हाण म्हणाले की, महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमनाशी संबंधित विधेयक जोडून भाजपाने राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत हे षडयंत्र हाणून पाडले.
महिलांच्या सन्मानासाठी काँग्रेसचा दावा
काँग्रेसने नेहमीच महिलांचा सन्मान केला असून, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिलांना प्रथम आरक्षण दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच देशभरात सर्वाधिक महिलांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची संधी काँग्रेसने दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
👉 हे देखील वाचा : परतवाडा प्रकरणात आरोपी अयान अहमद ताब्यात; मोबाईल जप्त, डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू
विधेयकावर पुन्हा चर्चेची गरज काय?
ते पुढे म्हणाले की, महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय २०२३ सालीच घेण्यात आला होता आणि त्यावेळी काँग्रेससह सर्व पक्षांनी त्यास पाठिंबा दिला होता. अशा परिस्थितीत पुन्हा याच विषयावर संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपाच्या भूमिकेवर टीका केली.
— प्रतिनिधी महालोकवार्ता
👉 राजकारणाशी निगडीत महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : राजकारण


