akola municipal protest 24 villages march : अकोल्यातील २४ गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा महापालिकेवर मोर्चा धडकला. मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा.


अकोला : महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २४ गावांतील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीने आज, शुक्रवार २४ एप्रिल रोजी महापालिकेवर भव्य मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला. गांधी जवाहर बाग येथून सकाळी ९.३० वाजता निघालेला हा मोर्चा महापालिका कार्यालयावर धडकला.
👉 हे देखील वाचा : महिला आरक्षणावरून भाजपावर काँग्रेसची टीका; परभणीत खा. रविंद्र चव्हाण यांचे वक्तव्य
गेल्या दहा वर्षांपासून हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणी, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या सुविधा अपुऱ्या असल्याचा आरोप करत, नागरिकांकडून कर वसुली मात्र नियमित सुरू असल्याने ही सरळ आर्थिक लूट असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. “सुविधा नाहीत, पण कर भरावा लागतो” या भूमिकेतून नागरिकांनीही मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, अकोला पूर्व महानगर अध्यक्ष तथा मनपा गटनेते निलेश देव, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, दामोदर जगताप, मनोहर बनसोड, गजानन गवई, विकास सदांशिव, नगरसेवक पराग गवई, शेख शमशु, सुनिल इन्नाणी, नगरसेविका उज्वला पातोडे, जयश्री बहाद्दूरकर, प्रविण पातोडे, नितेश किर्तक, यशपाल जाधव, किशोर तेलगोटे, नागेश नाईक, सौरभ बहाद्दुरकर आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


“हद्दवाढ झाली, पण विकास नाही” — आंदोलनकर्त्यांचा आरोप
सन २०१६ मध्ये २४ गावांचा महानगरपालिकेत समावेश करताना विकासाची आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या भागात आजही पाणीटंचाई, स्वच्छतेचा अभाव आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या कायम असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला.
👉 हे देखील वाचा : जीगाव प्रकल्पातून अकोल्याला मिळणार पाणी; दीड वर्षात १३ नवीन टाक्यांची उभारणी
मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्या मांडत, त्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. प्रशासनाने त्वरित सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या
२४ गावांच्या हद्दवाढीतील प्रभाग ३, ४, ५, १२, १३ व १४ मध्ये पाण्याचे नियोजन करावे.
नागरिकांना नियमाप्रमाणे मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
प्रभाग १४ मधील अन्यायकारक घरकर रद्द करून तो नियमबद्ध करावा.
पाणीपुरवठा विभागातील निष्क्रिय कर्मचाऱ्यांची भरती करावी.
मोकाट कुत्र्यांवर तात्काळ उपाययोजना करावी.
मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात फवारणी करावी.
— प्रतिनिधी महालोकवार्ता
👉 अकोल्यासह परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा : विदर्भ


