Deer rescue from well Akola : अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथे ८० फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले. रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे हरणाला जीवदान मिळाले.


अकोला : जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथे मंगळवार, २८ एप्रिल रोजी एका शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत हरण पडल्याची घटना घडली. शेतकरी अविनाश भाकरे यांनी याबाबत तात्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाने जलद कारवाई करत हरणाचे सुरक्षित रेस्क्यू केले.
👉 हे देखील वाचा : दिव्यांगत्वावर मात; सर्पमित्र बाळ काळणे यांनी १५ फूट अजगराला दिले जीवदान
वनपाल गजानन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, प्रवीण पवार आणि प्रदीप खडे यांनी बचावकार्य हाती घेतले. विहीर खोल व अडगळीची असल्याने शिडीच्या साहाय्याने वैद्यकीय सहायक प्रवीण पवार खाली उतरले. त्यांनी काळजीपूर्वक हरणाला बांधून वर आणले.
वर काढल्यानंतर हरणाला पाणी पाजून त्याची प्रकृती तपासण्यात आली आणि ते सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचावकार्यादरम्यान पवन भाकरे आणि अमोल भाकरे यांनीही सहकार्य केले.
👉 हे देखील वाचा : अमरावतीत कृषी केंद्रांवर कारवाई; 10 परवाने निलंबित, शेतकऱ्यांना इशारा
दरम्यान, पाण्याच्या शोधात वन्यजीव गावांकडे व विहिरीकडे येत असल्याचे वनविभागाने सांगितले. अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरीपासून दूर पाण्याची सोय करावी, जेणेकरून वन्यजीव तेथे पाणी पिऊन पुन्हा जंगलाकडे वळतील, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी केले आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


