India emergency alert cell broadcast system message : देशभरात 11:41 वाजता मोबाईलवर आलेल्या इमर्जन्सी अलर्टमागचं कारण समजलं. भारत सरकारने Cell Broadcast Messaging System सुरू केली असून आपत्तीवेळी त्वरित इशारा मिळणार.


नवी दिल्ली : शनिवारी सकाळी 11:41 वाजताच्या सुमारास देशभरातील कोट्यवधी मोबाईल फोनवर अचानक इमर्जन्सी अलर्टचा संदेश धडकताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र घाबरण्याचे कारण नसून, केंद्र सरकारने अधिकृतपणे ‘Cell Broadcast Messaging System’ (सेल ब्रॉडकास्ट प्रणाली) सुरू केल्याची ही चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
👉 हे देखील वाचा : देशभर उष्णतेची लाट कायम; IMDचा इशारा, पुढील काही दिवसांत पाऊस व हवामान बदलाची शक्यता
नेमकं काय घडलं ?
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने ‘Cell Broadcasting’ प्रणालीची देशव्यापी चाचणी घेतली. ज्यांच्या मोबाईलमध्ये संबंधित सेटिंग सुरू होती, त्या वापरकर्त्यांना ‘Extremely Severe Alert’ असा संदेश प्राप्त झाला.
या मेसेजद्वारे नागरिकांना कळविण्यात आले की, भारताने देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित आपत्ती इशारा सेवा सुरू केली असून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही.
आपत्ती व्यवस्थापनात मोठं पाऊल
नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीच्या काळात नागरिकांना त्वरित सावध करणे हा या यंत्रणेचा मुख्य उद्देश आहे. पूर, भूकंप, त्सुनामी, वादळ किंवा इतर संकटांच्या वेळी काही सेकंदांत कोट्यवधी लोकांपर्यंत माहिती पोहोचवता येणार आहे.
‘Cell Broadcast System’ चे महत्त्वाचे फीचर्स
इंटरनेट किंवा डेटा कनेक्शनची आवश्यकता नाही
नेटवर्क जाम असतानाही मेसेज पोहोचतो
ठराविक क्षेत्रासाठी (जिल्हा/शहर) अलर्ट पाठवता येतो
सायलेंट मोडमध्येही मोठा आवाज व व्हायब्रेशन
अनेक स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध
पूर्णपणे मोफत सेवा
रिअल-टाइममध्ये तात्काळ सूचना
👉 हे देखील वाचा : बच्चू कडू शिंदेसेनेत; झिशान सिद्दीकींना उमेदवारी, अकोला-बुलढाण्यात नाराजी
SACHET प्लॅटफॉर्मवर आधारित प्रणाली
सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत 2 मे 2026 रोजी ही प्रणाली सुरू करण्यात आली.
या उपक्रमाचा केंद्रबिंदू ‘SACHET’ (Integrated Alert System) हा प्लॅटफॉर्म असून, तो सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) यांनी विकसित केला आहे. ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या Common Alerting Protocol वर आधारित आहे आणि देशातील सर्व 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.
SMS पेक्षा अधिक प्रभावी अलर्ट प्रणाली
याआधी आपत्तीवेळी SMS द्वारे सूचना पाठवल्या जात होत्या. आतापर्यंत 19 पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये 134 अब्जांहून अधिक SMS अलर्ट पाठविण्यात आले आहेत.
मात्र, नवीन सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान हे पारंपरिक SMS पेक्षा अधिक प्रभावी असून, हे अलर्ट फोनच्या सेटिंग्स ओव्हरराइड करून थेट स्क्रीनवर दिसतात आणि मोठ्या आवाजासह वापरकर्त्यांचे लक्ष वेधतात.
कोणत्या परिस्थितीत उपयोग?
भूकंप, त्सुनामी, पूर
वीज पडणे, चक्रीवादळ
गॅस गळती, रासायनिक धोके
युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थिती
एकूणच, ‘Cell Broadcast Messaging System’ ही भारताच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत मोठी क्रांती ठरणार असून, भविष्यात आपत्तीच्या वेळी लाखो लोकांचे प्राण वाचवण्यास ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


