Khamgaon Leopard Rescue : खामगाव तालुक्यातील निरोड येथे विहिरीत पडलेल्या ४ वर्षांच्या बिबट्याचा वन विभागाने यशस्वी बचाव करून त्याला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडले.


खामगाव : खामगाव परीक्षेत्रातील गणेशपुर वर्तुळातील मौजे निरोड येथील शेतशिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने यशस्वीरित्या जेरबंद करत सुरक्षितपणे बाहेर काढले. या थरारक रेस्क्यूमुळे स्थानिकांमध्ये सुटकेचा निश्वास सोडण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी निरोड येथील पोलीस पाटील श्री. गजानन काळे यांनी श्री. बाळू दगडू मार्कड यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३४६ मधील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
सदर बिबट्या नर असून अंदाजे ४ वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले. रेस्क्यू टीमने अत्यंत दक्षतेने पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला जेरबंद केले आणि विहिरीबाहेर सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सावळे यांनी बिबट्याची प्राथमिक तपासणी केली असता तो पूर्णपणे सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला ज्ञानगंगा अभयारण्यातील वाकी बिट परिसरात सोडण्यात आले.


ही संपूर्ण कारवाई शूटर संदीप मडावी, पवन वाघ, अमोल चव्हाण तसेच रेस्क्यू टीममधील मनोज आग्रे, सोनुने, रविंद्र मोरे, लठाड साहेब, लता अबुलकर आणि मिलिंद इंगळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
— प्रतिनिधी, महालोकवार्ता


