Nimbha superstition case arrest : मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा येथे अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलांवर अमानुष कृत्य प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी चेतन मुळे याला अटक केली. व्हायरल व्हिडिओनंतर कठोर कारवाई.


मूर्तिजापूर (जि. अकोला) : तालुक्यातील निंभा गावात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अमानुष प्रकाराने संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. संबंधित व्हिडिओमध्ये एका चिमुकल्यावर कोणत्याही वैद्यकीय उपचारांशिवाय अघोरी पद्धतीने कृत्य केले जात असल्याचे स्पष्ट दिसून आले होते. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणारा चेतन सुनील मुळे (वय २४) हा दरबार भरवून लहान मुलांवर अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचा आरोप आहे.
👉 हे देखील वाचा : निंभा गावात अघोरी उपचाराचा व्हिडिओ व्हायरल, चेतन महाराज अडचणीत
या प्रकाराची गंभीर दखल घेत अकोला येथील बाल कल्याण समितीच्या सदस्या प्रांजली मनोज जैस्वाल यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५, बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ७५ तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी १६ एप्रिल रोजी पोलिसांनी संबंधितांना नोटीसही बजावली होती; मात्र दर सोमवारी अघोरी दरबार सुरूच असल्याचे समोर आल्यानंतर २२ एप्रिल रोजी कठोर कारवाई करण्यात आली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन केले. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत आरोपी अमरावती येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असून या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस पथकाचा सहभाग होता.
👉 हे देखील वाचा : १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला; पिंजर पोलिसांची तत्पर कारवाई
अंधश्रद्धेवर पोलिसांचा मोठा प्रहार
व्हायरल व्हिडिओमुळे उघडकीस आलेल्या या प्रकरणात सुरुवातीला नोटीस देऊनही प्रकार सुरूच राहिल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेत गुन्हा दाखल केला आणि फरार आरोपीचा शोध घेऊन अखेर त्याला अटक केली. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अमानुष कृत्यांवर पोलिसांनी दिलेला हा ठोस प्रतिसाद मानला जात असून, परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे.
प्रतिनिधी : महालोकवार्ता


